Parliament winter session – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारपासून झाला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्यामुळे गदारोळ झाल्याने कुठल्याही ठोस स्वरूपाच्या कामकाजाविना दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्याची वेळ आली. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकताच अमेरिकेने ठपका ठेवला. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आणि भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे. तो मुद्दा विरोधकांनी दोन्ही सभागृहांत उपस्थित केला. संबंधित प्रकरणी चौकशीची मागणी त्यांनी लावून धरली. त्याशिवाय, मणिपूरमधील अशांत स्थिती, भूस्खलनग्रस्त वायनाडला तातडीने मदत देण्याची गरज, उत्तरप्रदेशच्या संभलमधील हिंसाचार आदी मुद्दे विरोधकांनी पुढे केले. त्यांच्या घोषणाबाजीमुळे दोन्ही सभागृहांत गदारोळाची स्थिती निर्माण झाली. अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत करण्याची मागणी अधिवेशनात लावून धरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रामुख्याने त्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती असल्याचे स्पष्ट झाले. त्यातून अधिवेशनकाळात गदारोळाचे सत्र चालूच राहणार असल्याचे सूचित होत आहे. संसद अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालेल.