थिएटरमध्ये गोंधळ ! अभिनेत्री रुची गुज्जरची निर्मात्याला चप्पलेने मारहाण; नेमकं प्रकरण काय?

Ruchi Gujjar : ‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये अभिनेत्री रुची गुज्जर हिने निर्माता करण सिंग चव्हाण याला थेट चप्पलेने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल २४ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप करत गुज्जर हिने मुंबईतील ओशिवारा पोलीस ठाण्यात एफआयआरही दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री रुची गुज्जर हिच्या म्हणण्यानुसार, करण सिंग चव्हाण यांनी तिला एका टीव्ही प्रोजेक्टमध्ये सहनिर्माता म्हणून सामील होण्याची ऑफर दिली होती. या प्रोजेक्टसाठी गुज्जर हिने तिच्या कंपनीमार्फत २४ लाख रुपये देऊन गुंतवणूक केली होती. मात्र नंतर तो प्रोजेक्ट रद्द झाल्याचे सांगण्यात आले आणि पैसे परत न दिल्यामुळे गुज्जर यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
स्क्रीनिंगमध्येच थेट कारवाई:
‘सो लॉन्ग व्हॅली’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान रुची गुज्जर सिनेमागृहात पोहोचली आणि निर्मात्याला जाहीररित्या चप्पलेने मारले. “माझे पैसे घेऊन त्यांनी स्वतःचा सिनेमा तयार केला. माझ्या विश्वासाला तडा गेला,” असं म्हणत तीने घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पोलिसांची कारवाई सुरू :
रुची गुज्जर यांच्या तक्रारीनुसार करण सिंग चव्हाण आणि अभिनेता-निर्माता मन सिंग यांच्याविरोधात फसवणूक, धमकी आणि फसवेगिरीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित पैशांच्या व्यवहारांचे पुरावेही संकलित केले जात आहेत.
निर्मात्यांची भूमिका काय?
या प्रकरणावर अद्याप करण सिंग चव्हाण किंवा मन सिंग यांची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र रुची गुज्जर यांचा ठाम आरोप आहे की हे सर्व ठरवून केलेलं फसवणूक प्रकरण आहे आणि त्यांनी आपली न्यायासाठी लढाई सुरुच ठेवणार असल्याचं सांगितलं.





