Mumbai High Court : मुंबई हायकोर्टाच्या लिपिक परीक्षेवेळी गोंधळ !
संगणक आणि कीबोर्डमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा अर्ध्यावर थांबवावी लागली. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ५०० परीक्षार्थी उमेदवारांनी केंद्राबाहेर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

Mumbai High Court – मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाच्या भरतीसाठी सुरू असलेल्या टायपिंग टेस्टदरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर रविवारी मोठा गोंधळ उडाला. संगणक आणि कीबोर्डमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा अर्ध्यावर थांबवावी लागली. यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ५०० परीक्षार्थी उमेदवारांनी केंद्राबाहेर ठिय्या मांडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
रविवारी सकाळी परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच अनेक संगणक हँग होऊ लागले. काही ठिकाणी बोर्डची बटणे काम करत नव्हती, तर काही संगणकांमध्ये इंटरनल एररचे मेसेज येऊ लागले. जुनी आणि धुळखात पडलेली यंत्रणा वापरल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला. अनेक उमेदवारांनी महिनोंपासून या परीक्षेची तयारी केली होती. मात्र यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त होताच केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
संतप्त उमेदवारांनी तातडीने परीक्षा थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली. आम्ही दूरवरून पैसा आणि वेळ खर्च करून परीक्षेला आलो आहोत. तांत्रिक बिघाडामुळे आमचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप संताप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. काही वेळासाठी केंद्रातील परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती.
ही माहिती मिळताच अधिकारी आणि हायकोर्ट भरती विभागाचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी चर्चा करून तांत्रिक दोष दुरूस्त करण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी स्वरूपात पुन्हा परीक्षेची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका परीक्षार्थी उमेदवारांनी घेतली.
पुर्नपरिक्षेसाठी अभिजीत दीपके आक्रमक
छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक ठिकाणी हायकोर्टाची आज परीक्षा होती. त्यामुळे या परिक्षेसाठी खूप लांबून विद्यार्थी आले होते. ते जेव्हा परीक्षेला बसले तेव्हा त्यांना समजले की, तांत्रिक बिघाडामुळे कम्प्युटर काम करत नाही, तर कोणाची स्क्रीन काम करत नाही.
विशेष म्हणजे 10 मिनिटांच्या आत लॉग आऊट होत होते. याचा अर्थ सर्व्हरही व्यवस्थित काम करत नव्हते. ही सिस्टम फेल झाली आहे, सरकार फेल झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की, पुनर्परिक्षा झाली पाहिजे आणि लगेच झाली पाहिजे, असा हल्लाबोल अभिजीत दीपके याने केला.





