लाखो भाविकांकडून साईनामाचा गजर

शिर्डी – शिर्डी ग्रामस्थ व ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन आयोजित शिर्डी साई परिक्रमा भक्तिमय वातावरणात पार पडली. देश-विदेशातून सुमारे एक लाखापेक्षा अधिक संख्येने भाविक या परिक्रमेत सामील झाले होते. चौदा किलोमीटर अंतर असणारी ही भव्यदिव्य परिक्रमा सुरू असताना साईनामाचा गजर, ढोल ताशा, टाळ मृदुंग तसेच पारंपरिक वाद्यांच्या समवेत शिर्डी दुमदुमून गेली होती. हा अविस्मरणीय क्षण भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून ऐतिहासिक परिक्रमेचे भाग्यवान ठरले.
सोमवारी सकाळी साडे पाच वाजता महंत रामगिरी महाराज, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार सदाशिव लोखंडे, साई संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा प्रधान न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, मा. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष अभय शेळके, कमलाकर कोते यांसह अनेक मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्री खंडोबा मंदिरापासून या ऐतिहासिक परिक्रमेला सुरुवात झाली.
ठकठिकाणी भाविकांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी व्यवस्था केली होती, पोलीस बंदोबस्त, रुग्णवाहिका, डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीम, शेकडो स्वयंसेवक चौदा किलोमीटरच्या परिसरात तैनात होते. विशेष म्हणजे या परिक्रमेत पंचवीस फुटाची साईबाबांची मूर्ती खास गुजरात येथून आणण्यात आली होती. दिल्लीहून शेकडो भाविक रेल्वेच्या साहाय्याने पालखी घेऊन आले होते.
सुवर्ण रथ, रस्त्यावर ठिकठिकाणी रांगोळ्या, विविध फुलांच्या पाकळ्यांचा गालीचा, निशाण व छत्रे हातात धरून विशिष्ट पोशाखात असणारे चोपदार यामुळे ही साईंची परिक्रमा राजेशाही थाटात तब्बल एक लाख भाविकांच्या उपस्थित रस्त्याने चालत असतानाचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडून गेले. हा अविस्मरणीय क्षण हजारो भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपून ऐतिहासिक परिक्रमेचे भाग्यवान ठरले. सहा तासांच्या चौदा किलोमीटरचा पायी प्रवास करून परिक्रमेची सांगता साई मंदिर परिसराच्या सोळा गुंठ्यांत उभारण्यात आलेल्या सभा मंडपात झाली. पुढीलवर्षी 13 फेब्रुवारी रोजी परिक्रमेला येण्याचं आवाहन केले.





