शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून CBSE अभ्यासक्रमात बदल; विषयांची संख्या वाढली

नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीएसई शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता 10 विषयांचा अभ्यास करावा लागेल. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना एकूण सहा विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. एवढेच नाही तर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयात उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी दहा विषयांचा अभ्यास करावा लागतो. आता त्यापैकी तीन भाषा आणि सात मुख्य विषय असतील. सध्या तीन मुख्य विषय आणि दोन भाषा असं विषयांचं स्वरूप आहे. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य असेल. बंधनकारक भाषांपैकी दोन भारतीय असणंही आवश्यक असेल. गणित-संगणक, सामाजिक शास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि पर्यावरण शिक्षण हे सात मुख्य विषय असतील.
अकरावी-बारावीच्या स्तरावर दोन भाषा आणि चार मुख्य विषयांचा समावेश असेल. दोन भाषांमध्ये किमान एक भारतीय असणे बंधनकारक आहे. एक भाषा आणि चार विषय धरून पाच विषयात विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावे लागते. बारावीतील सर्व विषयांचे चार गटात वर्गीकरण केले जाईल. भाषा, कला, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, सामाजिक विज्ञान, आंतरविद्याशाखीय विषय, गणित, विज्ञान हे विषय या चार गटांत विभागण्यात आले आहेत.
सर्व विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक –
इयत्ता दहावी विद्यार्थ्यांना मुख्य सात विषय असणार आहेत. ज्यात गणित आणि संगणकीय विचार, सामाजिक विज्ञान, विज्ञान, कला, शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि निरोगीपणा, व्यावसायिक शिक्षण यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना सर्व विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याशिवाय बारावीच्या विद्यार्थ्यांना एका ऐवजी दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. दोनपैकी एक भारतात बोलली जाणारी भाषा असेल, तर चार मुख्य आणि एक ऐच्छिक विषय असेल. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क (एनसीआरएफ) अंतर्गत या विषयांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना दोन गटांमधून चार विषय निवडावे लागणार आहेत.




