पुणे | इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत “सीबीएसई’ अभ्यासक्रम

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (एससीईआरटी) तयार केलेल्या इयत्ती तिसरी ते बारावीसाठीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने अंतिम मान्यता दिली आहे.
त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्व शाळांना सीबीएसई पद्धतीचा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष यंदापासून दि. १ एप्रिलपासूनच सुरू होणार आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांचा अभ्यास करून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात आल्याने वादंग निर्माण झाला होता.
अभ्यासक्रम आराखड्यावर तीन हजारांहून अधिक हरकती सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करून अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला अंतिम मान्यता देण्यात आली.
नव्या घोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली हे घटक समाविष्ट करण्यात येतील. अंतिम मंजुरी दिलेला आराखडा “एससीईआरटी’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्य मंडळाच्या शाळांसाठी सीबीएसईचा अभ्यासक्रम स्वीकारण्यात येणार आहे. एनसीईआरटी, सीबीएसई यांच्याकडील पाठ्यपुस्तके इंग्रजी आणि हिंदी माध्यमांत उपलब्ध आहेत.
अन्य माध्यमांसाठी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर करून ती पाठ्यपुस्तके आवश्यक माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे देण्यात आली.
इतिहास, भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तके स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, जागतिक अशा आशयाचे करण्यात येणार आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके राज्यातच तयार होतील.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार शाळांना आवश्यक कामकाज कालावधी, राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यानुसार निश्चित केलेली श्रेयांक पातळी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अध्ययन कालावधी उपलब्ध करून देणे आवश्यक असेल.
दैनंदिन कामकाजासाठी वेळ कमी मिळत असल्याने शाळा जास्त दिवस सुरू ठेवून तो कालावधी वर्षभरात भरून काढता येईल. पहिलीपासून हिंदी विषय लागू करणे, राज्य मंडळाच्या शाळांनाही सीबीएसईचे १ एप्रिल ते ३१ मार्च असे वार्षिक वेळापत्रक लागू करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
शाळा दि. १ जूनपासून सुरू होणार
राज्य मंडळाच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होते. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागतात.
आता सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात होईल. दि. १ ते ३१ मे उन्हाळ्याच्या सुट्या राहतील. त्यानंतर पुन्हा १ जूनपासून शाळा सुरू होऊन मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतील.
234 दिवस शाळा भरणे आवश्यक
राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार वर्षभरातील राष्ट्रीय-राज्य सुट्या, सत्र सुटी, अन्य सुट्या विचारात घेतल्यानंतर २३४ दिवस कामकाज अपेक्षित आहे. त्यामुळे शाळांचा एकूण कामकाजाचा वेळ वाढणार असून, हे कामकाज पूर्ण करण्यासाठी सुट्या कमी कराव्या लागण्याची शक्यता आहे.





