Pune District : इस्लामपुरात सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं

अकलूज : माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथे श्री सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात झाला. इस्लामपूर येथील सर्व ग्रामस्थ व माने देशमुख परिवार एकत्रित येत दि. 24 ते 26 डिसेंबर या तीन दिवसांमध्ये विविध धार्मिक विधीसह श्री सिद्धनाथ जोगेश्वरीच्या नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण करण्यात आले. या निमित्ताने ग्राम प्रदक्षिणा मिरवणूक, देवता स्थापना, मूर्ती व कलशाला जलाधिवास, धान्य दिवस, नवग्रह स्थापना, काकडा, प्रवचन, किर्तन, हरी जागर असे विविध धार्मिक विधी व कलशारोहण हभप रविंद्रमहाराज सिद्धनाथ मठ म्हसवड यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास आमदार उत्तमराव जानकर, माजी पंचायत समिती उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील. सहकार महर्षी साखर कारखाना संचालिका स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संजय काका देशमुख, अमरभाऊ देशमुख, धैर्यशील देशमुख, मच्छिंद्र पवार, डॉ. रामदास देशमुख, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरास आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. धार्मिक विधीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आला.
हजारो भाविकांनी याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमास गावतील माहेरवासनी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांना गावच्या वतीने साडी देऊन सन्मान करण्यात आला. 30 वर्षा नंतर गावामध्ये ग्राम दैवत व कुलस्वामिनी मंदिराचा कार्यक्रम पार पडल्याने सर्वाच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता. लहान पासून आबालवृद्ध पर्यंत सर्वांनी प्रत्येक कार्यक्रमात हिर हिरीने भाग घेतल्याने हा भला मोठा धार्मिक सोहळा यशस्वी पार पडला.
1994 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच ठरवल होत यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दोन सभामंडप मंदिरास दिले; मात्र इतर मंदिर बांधकाम अडचण आल्यानंतर ते थांबलं. त्यानंतर 2023 साली माने देशमुख परिवार पुढाकार घेऊन सुमारे 31 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून राहिलेलं कामकाज पूर्ण केलं.





