Chandrayaan 3 : अंतराळातील नवी महाशक्ती ‘भारत’; चांद्रयान-3च्या लँडिंगची प्रतीक्षा….

नवी दिल्ली – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात “इस्रो’ने आजवर 124 अंतराळयान मोहिमा, 92 प्रक्षेपण मोहिमा पार पाडल्या आहेत. गगनयान (क्रूड/रोबो) सह अनेक मोहिमाही आखल्या आहेत. त्याचबरोबर इंटरप्लॅनेटरी मिशन आदित्य, चांद्रयान (ल्युपेक्स), शुक्रयान आणि मंगळयान अशा अभिमानास्पद मोहिमा राबवल्या आहेत.
“इस्रो’ने भारतीय समाजमनाला अभिमान वाटेल अशी कामगिरी नोंदवली आहे. आपल्या “मून मिशन’ अर्थात “चांद्रयान’ मोहिमेतील “चांद्रयान-3’चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात यशस्वी प्रवेश करून करुन एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कशी होती ही मोहीम आणि आधीच्या दोन मोहिमांमध्ये काय घडले, त्याविषयी जरूर वाचा…
वास्तविक, 23 ऑगस्ट ही तारीख आहे ज्या दिवशी चंद्रावर दिवस सुरू होतो. एक चंद्राचा दिवस पृथ्वीवरील 14 दिवसांच्या बरोबरीचा असतो, जेव्हा सूर्यप्रकाश सतत उपलब्ध असतो. चांद्रयान-3 च्या उपकरणांचे आयुष्य फक्त एका चंद्र दिवसाचे आहे. कारण ते सौरऊर्जेवर चालणारे उपकरण आहेत आणि त्यांना कार्यरत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. रात्री चंद्र खूप थंड होतो.
हे तापमान उणे 100 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा कमी तापमानात उपकरणे गोठू शकतात आणि काम करणे थांबवू शकतात. निरिक्षण आणि प्रयोगांसाठी जास्तीत जास्त वेळ मिळण्यासाठी चांद्रयान-3 चांद्र दिवसाच्या सुरुवातीला उतरणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, चांद्रयान-3 23 ऑगस्टपूर्वी उतरू शकत नाही आणि 24 ऑगस्टनंतर उतरू इच्छित नाही.
“चांद्रयान’ मोहीम हा भारताचा अभिमान : डॉ जयंत नारळीकर
पद्मविभूषण पुरस्कार विजेते, भटनागर पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध हॉयल-नारळीकर कॉस्मॉलॉजिकल मॉडेलचे भारतीय प्रतिनिधी, नारळीकर हे विज्ञानविश्वाला समर्पित एक दृढनिश्चयी व्यक्ती, ज्येष्ठ खगोल-भौतिकशास्त्रज्ञ, प्रख्यात मराठी विज्ञान कथा लेखक आणि इंटर युनिव्हर्सिटी कौन्सिल फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रो-फिजिक्सचे (आयुका) संस्थापक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेबद्दल खूपच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती.
ज्यावेळी “चांद्रयान’ मोहिमेचा बोलबाला सुरु झाला होता, त्यावेळी ते म्हणाले होते की, भारताला इस्रोच्या ‘मून मिशन’ सारख्या महागड्या मानल्या जाणाऱ्या मोहिमांची खरोखरच गरज आहे. आपण “चांद्रयान’ या मोहिमेकडे पूर्वीच्या मोहिमेची मोठी झेप म्हणून पाहिलं पाहिजे. चंद्रावर यानाचं सुरक्षित लॅंडींग साध्य केल्यानंतर भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवणं ही विजयाची परिसीमा मानली जाऊ शकते. आपला देश इतर राष्ट्रांच्या तुलनेत मागे राहू नये, अशीच प्रत्येक भारतीयाची इच्छा असली पाहिजे.
लॅंडर पे लोडस
1. रांभा एलपी – चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची घनता तपासण्यासाठी
2.चास्टे – चंद्राच्या पृष्ठभागाचे ध्रुवीय प्रदेशातील तापमान तपासण्यासाठी
3.इल्सा – चंद्राच्या पृष्ठभागावरील भूकंप अथवा कंपने मोजण्यासाठी
रोव्हर पे लोडस
1.एपीएक्सएस – चंद्रावरील वस्तुमानाचे क्षकिरण छायाचित्रण करण्यासाठी
2.लिब्ज – चंद्रावरील खनिज संपत्तीचा शोध घेण्यासाठी
चांद्रयान 1
22 ऑक्टोबर 2008 ते 28 ऑगस्ट 2009
भारताने खर्चिक अशा मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठवावे की नाही, या विषयावर बरीच चर्चा झाल्यानंतर, चंद्रावर यान पाठवण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार एक कालबद्ध कार्यक्रमही आखण्यात आला. चांद्रयान-1 हे भारताचे पहिले चांद्रयान होते. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 22 ऑक्टोबर 2008 रोजी प्रक्षेपित केले आणि ऑगस्ट 2009 पर्यंत चालवले गेले. या मोहिमेमध्ये चंद्राच्या परिभ्रमण यंत्र आणि प्रभावक यंत्राचा समावेश होता. या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला मोठी चालना मिळाली. भारताने चंद्रविषयी संशोधन करण्यासाठी स्वतःचे तंत्रज्ञान शोधले आणि विकसित केले. 8 नोव्हेंबर 2008 रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवेश करते झाले.
चांद्रयान 2
22 जुलै 2019
चांद्रयान-2 चे प्रक्षेपण 22 जुलै 2019 रोजी सतीश धवन स्पेस सेंटर येथील दुसऱ्या लॉन्च पॅडवरून दुपारी 2.43 वाजता एलव्हीएम-3 अर्थात लॉंच व्हेईकल मोड्युल-3 द्वारे चंद्रावर करण्यात आले. नियोजित कक्षाची पेरीजी 169.7 किमी (चंद्राच्या सर्वात जवळचे अंतर) आणि अपोजी 45475 किमी (चंद्रापासून दूरचे अंतर) होती. यामध्ये चंद्राचे परिभ्रमण, लॅंडर आणि रोव्हर यांचा समावेश होता. हे सर्व भाग भारतात विकसित करण्यात आले होते. चंद्रावरील पाण्याचे स्थान आणि विपुलता यांचा नकाशा तयार करणे हे मुख्य वैज्ञानिक उद्दिष्ट होते.
ऑर्बिटर फंक्शनल बिघाड अर्थात उतरण्याच्या अंतिम टप्प्यात नियंत्रण गमावल्यामुळे (सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे) लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाला.
चांद्रयान 3
14 जुलै 2023
चांद्रयान-3 चे प्रक्षेपण सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून 14 जुलै 2023 रोजी 2.35 वाजता एलएमव्ही-3 एम 4 द्वारे करण्यात आले. त्याविषयी सविस्तर माहिती आपण सतत वाचत आहोतच. आज या यानाच्या सफलतेचा प्रतीक्षाक्षण अवतरला आहे…
मार्स ऑर्बिटर मिशन
5 नोव्हेंबर 2013 ते 2 ऑक्टोबर 2022
मार्स ऑर्बिटर मिशन (“मॉम’), मंगळयान, हे 24 सप्टेंबर 2014 पासून मंगळाच्या कक्षेत फिरणारे एक यान आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 5 नोव्हेंबर 2013 रोजी “मंगळयान’ प्रक्षेपित केले होते. ही भारताची पहिली आंतर-ग्रहीय मोहीम आहे. सोव्हिएत स्पेस प्रोग्राम, नासा-अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सीनंतर मंगळावर पोहोचणारी इस्रो ही चौथी अंतराळ संस्था बनली. मंगळाच्या कक्षेत आपले यान पोहोचवणारे भारत हे पहिले आशियाई राष्ट्र आहे आणि पहिल्याच प्रयत्नात असे करणारे जगातील पहिले राष्ट्र आहे.
मार्स ऑर्बिटर मिशन
ऍस्ट्रोसॅट ही एक रिमोट कंट्रोल्ड टेलिस्कोप आहे. वैश्विक स्त्रोतांच्या विस्तृत श्रेणीमध्ये तीव्रतेच्या भिन्नतेचे एकाचवेळी मल्टी-वेव्हलेंथ मॉनिटरिंग करणे यासह ऍस्ट्रोसॅटची आणखी वैशिष्टये आहेत. नवीन ट्रान्झिएंट्ससाठी आकाशाचे एक्स-रे निरीक्षण करणे, हार्ड एक्स-रे आणि यूव्ही बॅंडमध्ये आकाशाचे सर्वेक्षण करणे, आकाशगंगांचे समूह आणि तारकीय कोरोनाचे ब्रॉडबॅंड स्पेक्ट्रोस्कोपिक अभ्यास करणे यासाठी ऍस्ट्रोसॅट हा टेलिस्कोप तयार करण्यात आला आहे.
“गगनयान’ हे भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे रचनात्मक अवकाशयान बनवण्याच्या उद्देशाने एक भारतीय ऑर्बिटर स्पेसक्राफ्ट आहे. अंतराळयान तीन लोकांना घेऊन जाण्यासाठी”गगनयान’ डिझाइन केले जात आहे. हे यान अंतराळ स्थानकाला डॉकिंग करण्याच्या क्षमतांनी सुसज्ज असेल. आपल्या पहिल्या क्रू मिशनमध्ये, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची मोठ्या प्रमाणावर स्वायत्त 5.3-मेट्रिक टन कॅप्सूल 400 किमी उंचीवर सात दिवसांपर्यंत दोन किंवा तीन लोकांच्या क्रूसह पृथ्वीभोवती फिरेल. इस्रोच्या एलएमव्ही-3 वर डिसेंबर 2021 मध्ये प्रथम क्रू मिशन लॉंच करण्याचे नियोजित होते. परंतु त्यानंतर ते 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.
भारतात असे काही लोक आहेत, जे विकसनशील राष्ट्रामध्ये अंतराळ कार्यक्रमाच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. चंद्र किंवा ग्रहांच्या शोधात किंवा मानवाने चालवलेल्या अंतराळ उड्डाणांमध्ये आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांशी स्पर्धा करण्याबाबत आपण फक्त कल्पनारम्यता बाळगत नाही. जर आपल्याला राष्ट्रीय स्तरावर आणि राष्ट्रांच्या समुदायामध्ये अर्थपूर्ण भूमिका बजावायची असेल, तर आपण आपल्या देशात आढळणाऱ्या मनुष्य आणि समाजाच्या वास्तविक समस्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात कोणत्याही मागे नसावे. अंतराळ संशोधनही त्याला अपवाद असणार नाही. भारताने सातत्याने अशा मोहिमा राबवल्या पाहिजेत.
– प्रा. डॉ. विक्रम साराभाई, भौतिकशास्त्रज्ञ, भारतीय अंतराळ संशोधन मोहिमांचे जनक
जराही दूरदृष्टी नसलेल्या अनेक व्यक्तींनी नव्याने स्वतंत्र राष्ट्रामध्ये अंतराळ मोहिमांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जो देश आपल्या लोकसंख्येला अन्न पुरवू शकत नाही, त्या देशाला कशाला हवे आहे अंतराळ संशोधन; असे विचारणारे लोक या देशात होऊन गेले. पण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू किंवा प्रा. विक्रम साराभाई या दोघांनाही अंतराळ संशोधनाचे महत्त्व पटलेले होते. जर भारतीयांना अन्य राष्ट्रांच्या समुदायात अर्थपूर्ण भूमिका बजावायची असेल, तर त्यांच्या वास्तविक जीवनातील समस्यांसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात हा देश पुढेच असला पाहिजे, अशी त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यामुळेच भारतात अंतराळ संशोधनाचा पाया घातला गेला.
– डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र तज्ज्ञ, दिवंगत राष्ट्रपती
आम्हाला विश्वास आहे की विक्रम लॅंडर निर्धारीत वेळेत योग्य त्या प्रक्रियेने चंद्राच्या पृष्ठभागावार सुखरुप लॅंडिंग करेल. कारण आतापर्यंत सर्व काही नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घडले आहे. कोणतीही कक्षा बदलताना चांद्रयानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड निर्माण झालेला नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागलेला नाही. सर्व टप्प्य्यांवर आम्ही सर्व तयारी केली असून सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित केलेल्या आहेत. आता आम्ही सुरक्षित लॅंडिंगची तयारी करत आहोत. विक्रम लॅंडर आणि रोव्हर’च्या सर्व यंत्रणा, उपकरणांच्या अचूकतेची तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यामुळे बुधवारी भारत अंतराळ महाशक्ती बनण्याचा आम्हाला विश्वास आहे.
– एस. सोमनाथ,भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष





