Chandrashekhar Bawankule : वेदनांची कल्पना संवेदनाहीन माणसाला आहे का? चंद्रशेखर बावनकुळेंची नाना पटोलेंवर टीका

नागपुर : नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरचा कॉम्प्युटर गेम म्हणून उल्लेख केला. यावरून काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या मोहिमेची हेटाळणी करणे म्हणजे फक्त वीर जवानांचा आणि त्यांच्या शौर्यांचा अपमान नाहीतर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे. नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत, याची कल्पना या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी, भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरबाबत पूर्वकल्पना दिली. तसेच तुमच्या लोकांना तिथून हटवा, असे सांगण्यात आले. शिवाय, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारावरून धमकी दिल्यानंतर ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले. लहान मुले कॉम्प्युटरवर गेम खेळतात तसा गेम खेळवण्यात आला अशी टीका केंद्र सरकारवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर हल्लाबोल केला.
बावनकुळे पुढे म्हणाले की, नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर केलेली धाडसी आणि शौर्याची कारवाई आहे. ही देशद्रोह्यांच्या छातीत धडकी भरवणारी जाज्वल्य शौर्यगाथा आहे. देशाच्या जवानांचे शौर्य, दहशतवादाविरोधातली कारवाई आणि भारत मातेच्या रक्षणासाठीचा लढा काँग्रेसला खेळ वाटतो? तुमचे नेते राहुल गांधीही परदेशात जाऊन भारताचा अवमान करतात.
सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागण्याची मानसिकता काँग्रेसने दाखवली. पण देश उघड्या डोळ्यांनी पाहतोय की कोण वीरांच्या बाजूला आहे आणि कोण पाकिस्तानच्या ? नाना, तुमच्या या देशद्रोही मानसिकतेला देश कधीच माफ करणार नाही. तुमचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला आहे, अशी टीका त्यांनी अधिकृत सोशल मिडियावरून केली.





