Chandrashekhar Bawankule Video: संतापलेल्या कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना घेरलं

नागपूर: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत कलह उफाळून आला आहे. नागपूरमधील प्रभाग १५ मध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप करत, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर घेरले.
प्रभाग १५ मधील दोन महिलांच्या जागांवर नुकताच काँग्रेसमधून आलेल्या आणि पक्षप्रवेश केलेल्या महिलांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ही माहिती मिळताच अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संयमाचा बांध फुटला. “आम्ही ३०-४० वर्षे पक्षासाठी आयुष्य खर्ची घातले, सतरंज्या उचलल्या, मग आता उपऱ्या लोकांसाठी आम्हाला का डावलले जात आहे?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांना विचारला.
साहेब, बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी, निष्ठावंतांचं काय? कार्यकर्त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना घेरलं VIDEO pic.twitter.com/q7hK1kiAOX
— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) December 29, 2025
नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर बावनकुळे बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपली वेदना मांडताना सांगितले की, निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देणे ही कार्यकर्त्यांची क्रूर थट्टा आहे. केवळ आश्वासन नको, तर ठोस कृती हवी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. “तुमच्या भावना मी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवीन, यावर योग्य तो विचार केला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, या घटनेमुळे भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, आता पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





