“निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची शरद पवारांची भाषा” ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

Chandrashekhar Bawankule । राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यातच या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्याकडून महाराष्ट्रात दंगल घडवण्याची भाषा केली जात आहे. यामागील त्यांचा हेतू लक्षात येत नाही, असा गंभीर आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. ते आज सकाळी नागपूरमध्ये बोलत होते. यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची शरद पवारांची भाषा Chandrashekhar Bawankule ।
माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी,”निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार बोलत आहे, ते चांगलं नाही. जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातील जनता दंगलीपर्यंत जाईल अशी परिस्थिती कधी नव्हती आणि होणारही नाही. पण काही लोक समाजात तेढ निर्माण करणे, अशी काही आंदोलनं निर्माण करत आहेत, ज्यामधून तेढ निर्माण होईल. समाजाला विचलित ठेवण्याचे काम काही लोक करत आहेत. राज्यात वेगवेगळी आंदोलनं तयार करून समाजासमाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही, “असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
पुढे बोलताना बावनकुळे यांनी “मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते गेले नाहीत. ते बाहेर बोलून या मुद्द्यावरुन राजकारण करत आहे. काँग्रेसने समाजात तेढ निर्माण करून वाद निर्माण करून आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवला आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतात. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे सरकार येईल. तेव्हा हे सरकार गरीब कल्याण योजना राबवणार असल्याचा दावाही केला.
देवेंद्र फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न Chandrashekhar Bawankule ।
दरम्यान, वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या अनुषंगाने बोलताना बावनकुळे यांनी म्हटले की, प्रकाश आंबेडकर हे राजकारणासाठी बोलले असतील. देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांची मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयातील भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. पण लोक सुज्ञ आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटले.
हेही वाचा
काका- पुतण्यात कोण ठरणार वरचढ? सदस्यत्व राहणार की जाणार ? आज सर्वोच्च न्यायालयात फैसला





