OBC Reservation : बावनकुळे यांचा आरोप बिनबुडाचा – छगन भुजबळ

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमुळे आरक्षण मिळण्यास उशीर लागला, हा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप बिनबुडाचा आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
बावनकुळे यांच्या आरोपावर बोलताना भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षण मिळायला उशीर झाला कारण ही केस 2017 ची आहे. 2019 पर्यंत राज्यात भाजपचे सरकार होते. त्या तीन वर्षांत त्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तसेच केंद्र सरकारने त्यांनाही इम्पिरिकल डेटा दिला नव्हता. 2019 नंतर आमचे सरकार आले, मात्र कोरोना असल्यामुळे आम्हाला डेटा गोळा करण्यास अडचण आली होती.
तसेच केंद्र सरकारने देखील कोरोनामुळे अद्याप जनगणनेला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आमच्या सरकारमुळे आरक्षण मिळण्यास उशीर लागला, हा बावनकुळे यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे भुजबळ म्हणाले.
दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी सुनावणी पार पडली. यात महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यास परवानगी दिली आहे.





