“राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलेल्या खात्यांमध्ये..” खातेवाटपाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितलं

मुंबई – राज्याच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपासोबतच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. तिन्ही मंत्र्यांच्या समन्वयाने निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जी खाती देण्यात आली आहेत त्यामध्ये समन्वय आहे. तिन्ही मंत्र्यांनी एकत्र बसून या खात्याबाबत समन्वय निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाला सर्वांची संमती आहे. कधीच कुठले खातं हे महत्त्वाचे किंवा अतिमहत्त्वाचे नसते. 13 कोटी जनतेच्या विकासाकरिता प्रत्येक खातं महत्त्वाचं आहे. खात्याला लहान-मोठं म्हणणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्रातील जनतेला दिलासा मिळेल, असे काम मंत्री महोदय करतील.
महाराष्ट्र आणि देशाचे जे रॉकेट सरकार आहे. हे सरकार विकासाची कामं रॉकेटच्या स्पीडने करत आहे. आमचा स्ट्राइक रेट हा 90 टक्के आहे. जागेबाबत आमचे वरिष्ठ आणि संसदीय मंडळ निर्णय घेईल. परंतु आम्ही आमचा रेट 90 टक्के ठेवू आणि जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न करू. 152 पेक्षा अधिक जागेवर आम्ही निवडून येऊ.
उद्धव ठाकरे कोणत्या मानसिकतेच्या आधारे बोलताहेत हे सर्वांना माहिती आहे. देवेंद्र फडणवीसांनी काल महाभारत आणि रामायणातले दाखले दिले होते. हे दाखले मी कुणाला उद्देशून देत नाहीये, असं मी स्पष्टही केलं होतं. शेवटी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला धोका दिला असेल तर त्यांना पुढच्या वेळी जागा दाखवावी लागते, असंही बावनकुळे म्हणाले.





