“कमळ आणि ढाल-तलवार मिळून तुम्हाला…” बावनकुळेंचा काँग्रेसला इशारा

सध्या राज्यात अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून मशाल हे चिन्ह मिळाले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये काँगेसचे नाना पटोले आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे.
नाना पटोले यांनी शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार चिन्हांवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंचा चांगलाच समाचार घेतल्याचे पाहायला मिळाले. गोंदिया येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना बावनकुळे यांनी काँगेसवर निशाणा साधला. तुम्ही शिंदेंची काळजी करू नका, तुम्ही तुमच्या मशाल आणि पंजाची काळजी घ्या, असा शब्दांत बावनकुळेंनी टीका केली आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही एक आहोत. भाजप पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी आमची काळजी करू नये. तुम्ही मशालीची, पंजाची आणि घडाळ्याची चिंता करा. कमळ आणि ढाल-तलवार हे दोन्ही मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला लढण्यासाठी उमेदवारही मिळणार नाहीत”, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
“सूर्यासमोर दिवा अशी नाना पटोले यांची स्थिती आहे. ज्या भाजपच्या जीवावर ते खासदार म्हणून निवडून आले होते तेच ओरडू ओरडू टीका करत आहेत. नरेंद्र मोदींवर टीका करण्याअगोदर त्यांनी आपली क्षमता लक्षात ठेवावी. संपूर्ण देशाने ज्या नेत्याला निवडून दिले त्यावर तुम्ही टीका करता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे मोदी-मोदी करत राहतात, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.




