Chandrapur Politics : चंद्रपूरच्या महापौरपदाचा फॉर्म्युला ठरला ! वडेट्टीवारांनी दिली माहिती
चंद्रपूर महापालिकेतील (Chandrapur Politics) 66 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळवला. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी 34 जागांची आवश्यकता असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.

Chandrapur Politics :चंद्रपूर महापालिकेतील (Chandrapur Politics) 66 जागांपैकी काँग्रेसने सर्वाधिक 27 जागांवर विजय मिळवला. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी 34 जागांची आवश्यकता असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले.
13 नगरसेवक खासदार प्रतिभा धानोरकर, तर 14 नगरसेवक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्व मानणारे होते.
त्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यापासून धानोरकर आणि वडेट्टीवार या गटात महापौरपदावरून रस्सीखेच सुरू होती. इतकेच नव्हे तर धानोरकर गटातील नगरसेवकांनी स्वतंत्रपणे गटनोंदणीही केली होती.
त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चार बैठका घेतल्या होत्या. मात्र तरीही हा तिढा सुटला नसल्याने काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना यात हस्तक्षेप करावा लागला. तसेच बुधवारी (04 फेब्रुवारी) दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांना महापौरपदाचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतून जो निर्णय घेतला, त्यानुसार गटनेतेपदी राजेश अरुण यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रतिभा धानोरकर म्हणतील तो महापौर होणार आहे. त्यामुळे आमच्याकडून कोणीही महापौर पदाचा अर्ज भरला नाही.
तसेच प्रतिभा धानोरकरांकडून चार महिलांनी अर्ज भरला आहे. तर उपमहापौर पदासाठी वसंतराव देशमुख यांनी अर्ज भरला आहे. आज आमच्या पक्षश्रेष्ठीच्या निर्णयानुसार राजेश अरुण यांची गटनेते पदी निवड झाली आहे. तसे पत्र काँग्रेस समितीने विभागीय आयुक्तांना पाठवले आहे.
त्यामुळे आता आमचे 27 नगरसेवक गट तयार करण्यासाठी आयुक्तालयात उपस्थित राहतील. पक्षश्रेष्ठींनी असा निर्णय घेतला असल्यामुळे आता कुठलीही संभ्रमाची किंवा वादाची परिस्थिती नाही, असा खुलासा त्यांनी केला.






