अजितदादा हलक्यात घेऊ नका, गृहमंत्री आमच्याकडे आहे; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना थेट इशारा

पुणे : राज्यात सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मात्र आमनेसामने आले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील कारभारावर अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपकडूनही आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे. अजितदादा, दमात घेऊ नका आणि हलक्यातही घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत, हे विसरू नका, असा थेट इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांवरून सध्या भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही महापालिकांमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होत असल्याने आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार चढली आहे. अजित पवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री आमच्याकडे; चंद्रकांत पाटलांचा इशारा
अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, नगरपालिका निवडणुकांच्या वेळी अजित पवारांनी तिजोरीची चावी आमच्याकडे असल्याचे म्हटले होते. त्यावेळी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, असे मी सांगितले होते. आता दमदाटीची भाषा केली जात आहे. त्यामुळे अजितदादांना सांगतो, दमात घेऊ नका आणि हलक्यातही घेऊ नका. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमच्याकडे आहेत.
दरम्यान, अजित पवारांच्या आरोपांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांना सोबत घेताना आपण देवेंद्र फडणवीसांना आधीच सावध केले होते, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला. आम्ही आरोप करायला लागलो, तर अजितदादांना अडचण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित पवारांचे भाजपवर गंभीर आरोप
भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली असून शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरत आहेत, असा आरोप अजित पवारांनी केला होता. याच पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांच्या विकासकामांचेही कौतुक केले होते.
याशिवाय अजित पवारांनी भाजप नेते व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरही जोरदार टीका केली. पुण्यातील गाजलेल्या जैन बोर्डिंग जमीन घोटाळ्याचा उल्लेख करत त्यांनी मोहोळ यांच्यावर आरोप केले. तसेच गुंड निलेश घायवळला परदेशात पळून जाण्यासाठी कोणी मदत केली, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.





