Chandrakant Patil : “एका पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं”; हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर चंद्रकांत पाटील स्पष्टच म्हणाले

Harshwardhan Patil | Chandrakant Patil – पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहेत. अशातच आज त्यांनी सिल्वर ओक या निवास्थानी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास 1 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
पक्ष प्रवेश निश्चित मानला जात असून उद्या शुक्रवारी (दि. 4) हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करणार असल्याची माहितीही समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करत असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
याआधी समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर लोकसभेला सोलापूरमधून मोहिते पाटील यांनी भाजपची साथ सोडली. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठे धक्के बसत आहेत.
हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. तसेच अंकिता पाटील यांच्या व्हाट्सअप प्रोफाईलवर तूतारीच चिन्ह पहायला मिळालं.
हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून एक पोस्टर तयार करण्यात आले असून हर्षवर्धन पाटील आणि तुतारी चिन्ह त्यात आहे. ते सध्या कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश निश्चित आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा तुतारीत प्रवेश होणार असून भाजपनेही त्यांच्या या दाव्यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, “राजकारणात महत्वकांक्षा असतात, हर्षवर्धन पाटलांचं चुकीचं सुरू आहे असं मी म्हणणार नाही. पण माझं म्हणणं आहे की, एका पक्षात राहण्याचे समाधान वेगळं असतं,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.





