“उद्धव ठाकरे सोबत आल्यास स्वागतच करू” ; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे वक्तव्य

Chandrakant Patil on Uddhav Thackeray । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून आतापर्यंत आलेल्या कलामध्ये महायुतीने 221 पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये एकट्या भाजपला 131 ठिकाणी आघाडी मिळाली आहे. त्यातच कोथरुडमधून भाजप नेते चंद्रकांत पाटील हे सध्या आघडीवर असून त्यांची देखील विजयाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येत आहे. याच विजयाचा आनंद साजरा करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी महत्वाचे विधान केले आहे.
पुण्यातील कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांनी लाडू वाटून विजयाचा जल्लोष केल्याचं दिसून आलं. यावेळी त्यांनी “उद्धव ठाकरे जर महायुतीमध्ये आले तर त्यांचे स्वागतच असेल” असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं. उद्धव ठाकरे जर महायुतीमध्ये येत असतील तर त्याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असेही ते म्हणाले.
कोथरूडमधून स्वतः चंद्रकांत पाटील हे आघाडीवर असून त्यांचा विजय आता निश्चित मानल जात आहे. त्याचवेळी यावेळी भाजपची इतिहासातील सर्वात चांगल्या कामगिरीकडे वाटचाल सुरू असून 131 ठिकाणी आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर महायुतीने 221 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीने 35 जागांवर आघाडी घेतली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी अंतिम निकाल आल्याशिवाय जल्लोष साजरा करू नये असं वरिष्ठांकडून निर्देश देण्यात आले आहेत. त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी मात्र जल्लोषाला सुरुवात केली आहे. चंद्रकांत पाटलांच्या कोथरुडमधील कार्यालयामध्ये 200 किलो लाडू आणण्यात आले आहेत. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसचे अनेक नेते पिछाडीवर पडल्याचं दिसून आलं. त्यामध्ये बाळासाहेब थोरात हे सुरुवातीपासून पिछाडीवर असल्याचं दिसतंय.





