Pune | चंद्रकांत पाटील यांना एक लाखांचे मताधिक्य

पुणे, – कोथरूड विधानसभा मतदारसंघात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजारांचे मताधिक्य मिळवत कोथरूडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेतला, तर मतदारांनीही या मताधिक्यातून चंद्रकांत पाटील कोथरूडकरच आहेत, यावर शिक्कामोर्तब केले. या वेळी भाजपसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालांची उधळण करत विजयी जल्लोष केला.
बाहेरचा आणि आयात उमेदवार म्हणून ओरड करणाऱ्यांना विरोधकांना कोथरूडकरांनीच मतदानातून उत्तर दिल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेणारे उमेदवार चंद्रकांत पाटील ठरले आहेत. २०१९ मध्ये दुरंगी लढत झाली होती. त्या वेळी पाटील यांना २५ हजारांचे मताधिक्य होते. २०२४ मध्ये तिरंगी लढत होईल असे वाटत होते. मात्र, या वेळी चंद्रकांत पाटील विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चंद्रकांत मोकाटे अशी लढत पाहायला मिळाली.
त्यातही मागील पाच वर्षे मतदारसंघात केलेली विकासकामे, विविध सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रम यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांची कोथरूडकरांशी नाळ जोडली. त्यामुळे ही लढत चुरशीची न होता पाटील यांनी चांगल्या मताधिक्याची मुसंडी मारल्याचे दिसून आले.
चंद्रकांत पाटील यांना १ लाख ५९ हजार २३४ मते मिळाली, तर चंद्रकांत मोकाटे यांना ४७ हजार १९३ मते मिळाली. म्हणजेच मोकाटे यांच्यापेक्षा १ लाख १२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळविले. यामध्ये मनसेचे अॅड. किशोर शिंदे १८ हजार १०५ मते पडली. वंचितचे योगेश राजापूरकर यांनी १ हजार ८०४, तर विजय डाकले यांना १ हजार १२५ मते मिळाली.





