‘चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस हे दोघे म्हणत असतील, काश ईव्हीएम मशीन होता’

कोल्हापूर – राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेत भाजपवर शरसंधान साधलं आहे.
पदवीधर हा सुशिक्षिताचा मतदारसंघ असून पुणे आणि नागपूर हे परंपरागत भाजपचे होते. मात्र जो विजय मिळविला त्याबद्दल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चांगली चपराक मिळाली असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान लोटस ऑपरेशन केल तर त्याचा कोणी माणूस निवडून येणार नाहीत. चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे आत्ता म्हणत असतील काश ईव्हीएम मशीन होता. अमेरिकेत ईव्हीएम वापरत नाहीत. ईव्हीएमवर लोकांचा संशय आहे. हा विजय आम्ही विनयाने स्वीकारतो. सत्ता आणि संपत्तीचा उन्माद नसावा, असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.
कोल्हापुरातील कोणत्याही जागेवरून आपण निवडून येऊ शकतो. नाही आलो तर थेट हिमालयात जाण्याची भाषा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. आता तर १२ वर्षे ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, त्या पुणे पदवीधर मतदारसंघातून त्यांनीच उभा केलेल्या उमेदवारांचा ५० हजार मतांनी पराभव झाला. आता त्यांनीच ठरवावे, हिमालयात जायचे की आणखी कोठे? अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, करोनाच्या संकटात भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. सुशांतसिंग राजपूत, कंगना प्रकरणात तर महाराष्ट्राचा अपमान केला. मात्र या निवडणुकीतून जनतेने त्यांना चोख उत्तर दिले. त्यांचे बालेकिल्ले ढासळले असून विजय विनयाने स्वीकारला पाहिजे. सत्तेची आणि संपत्तीची मस्ती फार काळ टिकत नाही. माझे आणि चंद्रकांत पाटील यांचे बांधाचे भांडण नाही; मात्र सत्तेत असताना ते माझ्याशी सुडाने वागले.
राजकीय व सामाजिक जीवनातून मला संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चूक कबूल करावी आणि या प्रकरणावर पडदा टाकावा असे आवाहन केले होते. एकटे-एकटे लढण्याची भाषा आता चंद्रकांत पाटील करीत आहेत. कसे लढायचे ते आम्ही ठरवू. हा निकाल पाहिल्यानंतर ईव्हीएम मशीन असते तर असे देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील म्हटले असते. तिन्ही पक्षांचे असेच मनोमिलन झाले तर यापेक्षाही चांगले यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुश्रीफ यांना भाजपा मध्ये येण्याची ऑफर
चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, हे खरे आहे. शरद पवार यांच्यावरील भक्तीपुढे मला सत्ता महत्त्वाची वाटत नाही. काही नसताना, माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी १६ वर्षे मंत्री केले. कदाचित राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष नसता तर मंत्रीही झालो नसतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले.





