उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? चंद्रकांत खैरेंना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू

मुंबई : महायुतीमधील मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर सुरू झाल्याचे सांगत लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार व खासादारांचे प्रवेश होणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेना शिंदे गटात अनेकजण प्रवेश करत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीत लाख मते घेतलेल्या राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अशातच आता या ऑपरेशन टायगरमध्ये पहिला माेहरा छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांच्या रुपाने गळाला लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांना खुली आणि अधिकृत ऑफर दिली आहे.
खैरे यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे नेहमी खुले असतील, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे यांना गोंजारत आपल्याकडे खेचण्याचा आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक हादरा देण्यासाठी शिवसेनेची यंत्रणा कामाला लागल्याचे समजते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची मोठी ताकद म्हणून चंद्रकांत खैरे यांचा नावलौकिक आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर याचे प्रमाण वाढतच गेले. काही भागांतील ज्येष्ठ नेते ठाकरेंसोबत ठामपणे उभे राहिले.
जुना संघर्ष चव्हाट्यावर
छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतेच विधानसभा निवडणुकीत लाख मते घेतलेल्या राजू शिंदे यांनी शिवसेनेला (ठाकरे गट) ‘जय महाराष्ट्र’ केला. तत्पूर्वी वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. खैरेंकडून शिंदेंनाही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. राजू शिंदे यांच्या आरोपामुळे दानवे आणि खैरे यांच्यातील जुना संघर्ष चव्हाट्यावर आला. यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत अंबादास दानवे यांनी उमेदवारी मागितली होती.
संजय शिरसाट यांच्याकडून खैरे यांना खुली ऑफर
मात्र, ज्येष्ठ नेते असल्याचे सांगत ठाकरेंनी खैरे यांना उमेदवारी दिली. चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव झाला, तर विधानसभा निवडणुकीत दानवे पराभूत झाले. हा वाद मिटवण्यासाठी मातोश्रीने मध्यस्थी केली. हा अंतर्गत वाद अद्याप मिटलेला नसल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदिपान भुमरे या दोन नेत्यांवर ही जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कारण मंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांना खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार
शिवसेनेचे शाखाप्रमुख, नगरसेवक, महापालिकेत विरोधी पक्षनेता, दोन वेळा आमदार, चार वेळा खासदार, राज्यातील युती सरकारमध्ये मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते आणि आता नेते असलेल्या खैरे यांची पक्षनिष्ठा, प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दरम्यान, आणखी काही पदाधिकारी, शिवसैनिक सेनेत आल्यास बळकटी येईल. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांना शिंदे गटात घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
चंद्रकांत खैरे याच्याबद्दल मला कधीही वैयक्तिक राग नाही. त्यांनी प्रामाणिकपणे पक्षाची सेवा केलेली आहे. त्यामुळेच मी आधीही सांगितले आहे की त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत. इतरांसाठी दरवाजे खुले नाहीत. मी त्यांच्या समोर ही अधिकृत ऑफर देत आहे. आम्ही हिंदुत्त्वाची कास घेतलेली आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार चालवलेले आहेत, हे खैरे यांनी मान्य केलेले आहे. त्यामुळेच खैरे यांचा आता आमच्यावर राग नाही. आमचाही फक्त खैरेंवर राग नाही. आता कोणती कास धरायची हे खैरे यांनी ठरवलं पाहिजे, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर नाराजी
चंद्रकांत खैरे म्हणाले कि, अंबादास दानवे संभाजीनगरातील कोणत्याही कार्यक्रमात मला विचारत नाहीत, अशी खदखद खैरे यांनी व्यक्त केली आहे. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमात बोलत नाहीत. कार्यक्रमांचं नियोजन करत नाही. मी सुरुवातीपासूनचा शिवसेनेचा नेता आहे. मी येथे शिवसेना वाढवलेली आहे. ते आता आले आहेत. मी अगोदरपासूनच येथे आहे. मी शिवसेना मोठी केली आहे, अशी खदखद चंद्रकांत खैरे यांनी बोलून दाखवली.
चंद्रकांत खैरे हे आमचे ज्येष्ठ नेते : दानवे
चंद्रकांत खैरे यांच्या या नाराजीवर अंबादास दानवे म्हणाले की, चंद्रकांत खैरे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमचे मार्गदर्शक आहेत. मी अशात कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. अलिकडे माझ्या घरी लग्न झालं. या लग्नात मी त्यांना घेऊन गेलो होतो. स्वत: त्यांना गाडीत फिरवलं होतं. सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. मी त्यांना बोलवलं होतं. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात कोणाचाही मानपान नसतो. मी तर आठवडा किंवा पंधरा दिवसांत मी त्यांना जाऊन भेटतो. त्यांचे दर्शन करतो. यापेक्षा त्यांना आणखी काय हवे, याबाबत मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिले आहे.





