Chandrahar Patil : चंद्रहार पाटील शिंदे गटाच्या उंबरठ्यावर ? चर्चांना पुन्हा उधाण, निर्णयावर सस्पेन्स कायम

Chandrahar Patil | राज्यातील आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (यूबीटी) गटाला सत्ताधारी शिंदे गटाकडून मोठे आव्हान मिळत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर सुरू झालेल्या गळतीला आळा घालण्यात ठाकरे गट अपयशी ठरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि डबल महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना पुन्हा जोर चढला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या तिकिटावर सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या पाटील यांनी मात्र स्पष्ट केले आहे की, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल.
यापूर्वीही चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. मात्र, त्यावेळी त्यांनी कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मात्र बुधवारी मंत्री संजय शिरसाट यांनी, “चंद्रहार पाटील सोमवारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत, त्यांना थांबवून दाखवा!” असे वक्तव्य केल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आतापर्यंत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.”





