चंद्राबाबूंनी लवकरात लवकर सरकारी बंगला सोडावा – अल्ला रेड्डी

अमरावती – आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडूंच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यातील सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेस पार्टीने एन.चंद्राबाबू नायडू यांच्याकडे सरकारी निवासस्थान खाली करण्याची मागणी केली आहे. वायएसआर कॉंग्रेसचे आमदार अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की, एन. चंद्राबाबू नायडू यांनी अवैध घरात राहत असल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून कोणताही वादविवाद न करता सरकारी निवास्थान सोडले पाहिजे.
अल्ला रामकृष्णा रेड्डी हे मंगलागिरी मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी बोलताना अल्ला रामकृष्णा रेड्डी म्हणाले, तेलुगु देसम पार्टीचे अध्यक्ष निवास्थान खाली करणार नसतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे.’ एन. चंद्राबाबू नायडू यांनी 6 मार्च, 2016 रोजी विधानसभेत सांगितले होते की, निवास्थान सरकारी आहे. त्यामुळे एन. चंद्राबाबू नायडू निवास्थान खाली करण्यास बांधील आहेत, असेही अल्ला रामकृष्णा रेड्डी यांनी सांगितले.





