War Updates: ट्रंप यांना मोठा धक्का ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचा बदलता सूर, ‘नाटो’मधून बाहेर पडण्याचा अमेरिकेचा इशारा
War Updates: अमेरिकेची नाराजी समोर आली आहे. सहयोगी देशांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत NATO मधून बाहेर पडण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले.

War Updates: इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जागतिक राजकारणात मोठे बदल दिसू लागले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला असून कच्च्या तेलाच्या किंमतीतही सातत्याने वाढ होत आहे. अनेक देशांमध्ये इंधन टंचाईची स्थिती निर्माण होत आहे.
याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प (Donald Trump) यांना मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर (Keir Starmer) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणबरोबर सुरू असलेला हा संघर्ष ब्रिटनचा युद्ध नाही आणि त्यात सहभागी होणे देशाच्या हिताचे नाही.
स्टारमर यांनी म्हटले की, या युद्धाचे आर्थिक परिणाम ब्रिटनला भोगावे लागतील, मात्र त्यासाठी देश तयार आहे. “हा कितीही मोठा संकटाचा काळ असला तरी आम्ही त्याचा सामना करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याची गरज –
दरम्यान, मध्यपूर्वेतील तणाव कमी करण्यावर भर देत त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा सुरू करण्याची गरज अधोरेखित केली. ऊर्जा पुरवठ्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रिटनने या प्रश्नावर राजनैतिक प्रयत्नांना गती दिली असून विविध देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांकडून या आठवड्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत सागरी वाहतुकीची सुरक्षा, अडकलेल्या जहाजे आणि नाविकांचे संरक्षण तसेच आवश्यक वस्तूंची वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा होणार आहे.
ब्रिटनने आखाती भागातील सागरी सुरक्षेसाठी सुमारे ३५ देशांना एकत्र आणत व्यापक समन्वय साधल्याचेही स्टारमर यांनी स्पष्ट केले. जी-७ देशांसोबतही याबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.
अमेरिका नाटोतून बाहेर पडणार –
दरम्यान, या घडामोडींमुळे अमेरिकेची नाराजी समोर आली आहे. सहयोगी देशांकडून अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीत NATO मधून बाहेर पडण्याचा विचार सुरू असल्याचे संकेत दिले.
या सर्व घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अनिश्चितता वाढली असून येत्या काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाटो काय महत्व आहे?
NATO (नॉर्थ अटलांटिक करार संघटना) ही 1949 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय लष्करी आघाडी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपातील सुरक्षेसाठी आणि सोव्हिएत संघाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कॅनडा आणि इतर युरोपीय देश असे मिळून आज NATO मध्ये 30 हून अधिक देश सदस्य आहेत.
NATOचा मुख्य उद्देश सदस्य राष्ट्रांचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा जपणे हा आहे. “एका सदस्य देशावर हल्ला म्हणजे सर्व सदस्यांवर हल्ला” (Collective Defence) हा याचा प्रमुख सिद्धांत असून तो करारातील कलम 5 मध्ये नमूद आहे. यामुळे कोणत्याही सदस्य देशावर आक्रमण झाल्यास इतर देश त्याच्या मदतीला धावून जातात.
शीतयुद्ध संपल्यानंतरही NATOचे महत्त्व कमी झाले नाही. दहशतवादविरोधी कारवाया, सायबर सुरक्षा, शांतता राखीव मोहिमा आणि आंतरराष्ट्रीय संकटांमध्ये हस्तक्षेप अशा विविध क्षेत्रांत NATO सक्रिय आहे. तसेच सदस्य देशांमध्ये लष्करी सहकार्य, संयुक्त सराव आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण केली जाते.
आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत NATO ही जगातील सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली लष्करी संघटनांपैकी एक मानली जाते.





