पुणे जिल्हा | खंडोबा मंदिरात सप्तशिवलिंगावर तब्बल ६६ वर्षांनी चंदन उटी

लोणी धामणी, (प्रतिनिधी) – सहाणेवर उगाळलेल्या चंदनाच्या उटीने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक चंदनाचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा, म्हाळसाई व बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती मोगर्याच्या सुंगधाने दरवळून गेल्या.
धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर,टाळ मृदंगाचा गजर,कपाळभर उटी व भंडारा लावून हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी आणि आबालवृध्द भाविक महिलाचा उस्फूर्त सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण वासंतिक चंदनउटीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धामणी (तालुका आंबेगांव)येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात शुक्रवारी अक्षयतृतीयेला (दि. १०) भल्या पहाटेला दिसून आले.
चैत्र महिन्यात उन्हाचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून देवाला शीतलता मिळावी यासाठी चैत्री पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यत चंदनउटी घालण्याची परंपरा आहे. धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात अक्षयतृतीयेच्या दिवशी पहाटे (दि. १०) पाच वाजता धामणीच्या सरपंच रेश्मा बोर्हाडे व अजित बोर्हाडे,
पहाडदर्याचे सरपंच मच्छिंद्रनाथ वाघ व अनिता वाघ शिरदाळेच्या सरपंच जयश्री तांबे व संतोष तांबे आणि जारकरवाडीच्या सरपंच प्रतिक्षा बढेकर व कल्पेश बढेकर, शामराव बढेकर व सारिका बढेकर या पांच जोडप्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाचा अभिषेक व वसंतपूजा करण्यात आली.
त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत, सुभाष तांबे,शांताराम भगत,पांडुरंग भगत,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,राहूल भगत,राजेश भगत,प्रमोद देखणे यांनी सप्तशिवलिंगावर चंदनउटी घालण्यास सुरुवात केली. सुवासिक चंदनाचा लेप देत असताना मंदिराच्या सभामंडपात टाळमृदुंगाच्या भक्तिमय स्वरात उटीभजनाचा जयघोषाची सुरुवात होऊन या उटीभजनात पंचपदी रुपाचा अभंग तसेच देवाच्या उटीचे अभंग भक्तिमय वातावरणात गायले जात होते.
मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली. मंदिराच्या आवारात व सभोवताली पहाटेच्या सुमारास रेश्मा बोर्हाडे, प्रीतम रोडे, ज्योती बोर्हाडे, स्वाती सोनवणे, अंकिता विधाटे, महेश्वरी आळेकर यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्याचे दिसून आले. वासंतिक चंदनउटीच्या भक्तीमय रसाळपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
६६वर्षांनी चंदनउटी…
धामणी येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिर पुरातन असून १९५८साली अक्षयतृतीयेला संत निळोबाराय यांचे तत्कालीन वंशज ह.भ.प. मकाशीर महाराज पिंपळनेरकर यांच्या आज्ञेनुसार स्वयंभू सप्तशिवलिंगाला चंदनाचा लेप देऊन चंदनउटी घालण्यात आलेली होती. त्यावेळी खंडोबा मंदिरातील चंदनउटी सोहळ्यासाठी राजाराम बेल्हे, गोपाळ देखणे, बाबुराव पाटील, सीताराम वामने, नानाबुवा विधाटे, नानाभाऊ रोकडे, हणमंतराव बोर्हाडे, सखाराम तांबे गुरुजी, बेरी गुरुजी या मंडळीचा सक्रीय सहभाग होता.
आज या मंडळीपैकी कोणीही हयात नाही. त्यानंतर काही अडचणीमुळे सप्तशिवलिंगावरील चंदनउटी सोहळ्यात खंड पडलेला होता. त्यानंतर बरोबर आज सहासष्ठ वर्षानंतर (दि. १०) अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर येथील खंडोबाच्या मंदिरात चंदनउटीचा भक्तीमय सोहळा आनंदात पार पडून चंदनउटीची सुरुवात झाली. येथून पुढे दरवर्षी अक्षयतृतीयेला खंडोबा मंदिरात चंदनउटी सोहळा साजरा करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी मंडळीनी यावेळी सांगितले.





