Chandan Nagar Blade Attack Case : मृत्यूशी झुंज अपयशी! प्रियकराने ब्लेडने गळा चिरलेल्या त्या तरुणीचा दुर्दैवी अंत
Chandan Nagar Blade Attack Case : प्रियकराने ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा शुक्रवारी (दि.८ ) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

Chandan Nagar Blade Attack Case – प्रियकराने ब्लेडने गळा चिरलेल्या तरुणीचा शुक्रवारी (दि.८ ) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांपासून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (२२,रा.चंदनगर, मुळ. उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी, प्रियकर आरोपी दिलीप राठोड (२२,रा. हिंगोली) याला चंदनगर पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातून अटक केली.
याप्रकरणी उजालादेवीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे याने तक्रार दिली होती. ही घटना बुधवारी (दि.२९) साडे आठच्या सुमारास चंदननगर येथील पठारेवस्तीत घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी दिलीप आणि उजालादेवी विमाननगर येथील मॉलमध्ये काम करत होते. तेथे दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र काही दिवसापासून त्यांच्यात वाद होते. त्याच कारणातून बुधवारी रात्री दिलीप तरुणी राहत असलेल्या पठारेवस्तीत आला.
त्याने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यावेळी ती एकटीच घरी होती. तिचा भाऊ, भावाची बायको बाहेर कामावर गेले होते. तरुणीने फोन करून आपल्या भावाला ही माहिती दिली. तु लवकर घरी ये, मला एका मुलाने मारले आहे. खूप लागले आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही. त्यानंतर तरुणीने आपल्या भावालाच व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी तरुणी भावाला रक्तबंबाळ अवस्थेत दिसली.
भावाने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत काही नागरिक, नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रुग्णालयात तरुणीला कोणी मारले असे विचारले तेव्हा तिला बोलता येत नव्हते. तिने इशारा करून पेन आणि कागद मागितला. त्यावर तिने दिलीप राठोड असे नाव लिहले. तरुणीवर हल्ला केल्यानंतर राठोड फरार झाला होता. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.




