Mula Canal : चांदा येथील मुळा कालव्याचा मोठा धोका टळला; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर
Mula Canal : चांदा शिवारातील मुळा उजव्या कालव्याचा भराव ढासळण्याचा धोका टळला. आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना केल्या.

Mula Canal : मुळा उजव्या कालव्यावरील चांदा शिवारातील किलोमीटर ४१ येथे कालव्याचा भराव ढासळण्याच्या स्थितीत आल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. भराव फुटल्यास कालव्याचे पाणी शेतांमध्ये तसेच गावात शिरून मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते.
घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. त्यामुळे भरावावरील पाण्याचा दाब कमी होऊन संभाव्य धोका टळला. यामुळे चांदा परिसरातील शेतजमिनी आणि घरांचे मोठे नुकसान टळल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, कालव्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मजबूत भराव टाकून कालवा पूर्ववत केला जात आहे. लवकरच खरीप आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार असल्याचे विभागाने सांगितले.





