Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार? मायकेल वॉनची भारताला घाबरवणारी भविष्यवाणी; म्हणाला, ‘जो कोणी…’

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलचे चार संघ निश्चित झाले आहे. ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ४ मार्च रोजी दुबईत खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकेल? याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे, ती काय आहे, जाणून घेऊया.
भारताने त्यांच्या लीग स्टेजच्या तिन्ही सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तसेच इंग्लंडला हरवून आणि पावसामुळे दोन सामने रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने ऑस्ट्रेलियाला धोकादायक म्हटले आहे. त्याने रोहित ब्रिगेडला घाबरवणारी भविष्यवाणी करताना यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोणता संघ नाव कोरणार? याबाबतही सांगितले आहे.
मायकेल वॉन काय म्हणाला?
भारताविरुद्ध जिंकणारा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता बनेल, असा मायकेल वॉनचा विश्वास आहे. त्याने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “जो कोणी भारताला हरवेल, तो जिंकेल… हे सोपे आहे… मला वाटते की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त ऑस्ट्रेलियनच भारताविरुद्ध जिंकू शकतात. पण दुबईच्या खेळपट्टीवर मला याबद्दल खूप शंका आहेत.”
Whoever beats India wins .. Simple .. I think it’s only the Aussies who could get them .. #ChampionsTrophy2025 but I very much doubt it on the Dubai pitch ..
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 2, 2025
मायकेल वॉनच्या पोस्टवर भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. एका युजर्सने कमेंट केली की, “तुमची शंका योग्य आहे. दुबईच्या खेळपट्टीवर रोहित ब्रिगेडच्या फिरकी हल्ल्यासमोर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध जिंकू शकत नाही. दुसऱ्या युजर्सने म्हटले की, ‘खरं तर, तुम्ही तुमचे स्पष्टीकरण तयार करत आहात. जर भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले तर खेळपट्टीची चर्चा होईल.’
Your doubts are all right. On these dubai pitches against this spin attack Australia can’t win against India. Also India never lost in Semis or quarter final against Australia.india is winning #ChampionsTrophy
— Satvinder Meel (@s4sattu) March 2, 2025
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाबद्दल काय म्हणाला?
भारतीय कर्णधार रोहित शर्माने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यापूर्वी सांगितले की, “ऑस्ट्रेलियाचा आयसीसी स्पर्धांमध्ये चांगला खेळण्याचा इतिहास आहे. त्या दिवशी आपल्याला गोष्टी आपल्या नियंत्रणात आणाव्या लागतील. त्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे, यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशा कमी सामन्यांच्या स्पर्धेत लय कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करतो. चुका होतात पण त्या दुरुस्त करणे महत्वाचे आहे.”





