चंपाय सोरेन यांची भाजप प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया म्हणाले,’पीएम मोदी आणि अमित शाह…’

Champai Soren in BJP। झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. आगामी विधानसभा निवडणुकीचे भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी चंपाई सोरेन शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. अशी माहिती दिली. त्यामुळे देशात पुन्हा एकदा मिशन लोटस पूर्ण होताना दिसून येत आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांवर झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर आपला विश्वास असल्याचेही चंपाई सोरेन म्हणाले आहे.
ते पुढे म्हणाले,’आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एक नवीन अध्याय सुरू केला आहे. आम्ही निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, परंतु जनतेच्या मागणीमुळे मी राजकारणात आहे. तुमची संस्था तयार करण्यास वेळ लागतो. आम्ही आमचे मत यापूर्वी व्यक्त केले होते.’
दरम्यान, चंपाई सोरेन यांचा भाजपमध्ये प्रवेश हा सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चासाठी (जेएमएम) मोठा धक्का मानला जात आहे. त्याचवेळी चंपाई सोरेन यांचा मोठा आदिवासी नेता म्हणून पक्षात समावेश करण्यात भाजप उत्साही आहे.
जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या अटकळांना पूर्णविराम देत चंपाई सोरेन यांनी २६ ऑगस्टला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी झारखंड भाजपचे सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमाही उपस्थित होते.
आदिवासी मतदारांवर भाजपचा डोळा
2011 च्या जनगणनेनुसार झारखंडची लोकसंख्या 3 कोटी 29 लाख 88 हजार 134 इतकी आहे. यामध्ये आदिवासींचा (एसटी) सहभाग ८६ लाख ४५ हजार ४२ इतका आहे. झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध असलेले चंपाई सोरेन कोल्हान प्रदेशातून येतात. या प्रदेशात सरायकेला, पूर्व सिंगभूम आणि पश्चिम सिंगभूम या जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे विधानसभेच्या 14 जागा आहेत.





