बांसुरी स्वराज यांच्या निवडीला आव्हान; सोमनाथ भारती यांची उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार बांसुरी स्वराज यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यासाठी बांसुरी यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि आपचे नेते सोमनाथ भारती यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर २२ जुलैला सुनावणी होण्याची शक्यता आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून भारती आणि बांसुरी यांनी एकमेकांविरोधात लोकसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये बांसुरी यांनी बाजी मारली. त्यांना ४ लाख ५३ हजार १८५ मतं मिळाली. तर, भारती यांना ३ लाख ७४ हजार ८१५ मतांवर समाधान मानावे लागले.
आता निकाल जाहीर झाल्यानंतर दीड महिन्याने भारती यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणुकीत बांसुरी यांनी भ्रष्ट मार्गांचा अवलंब केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाच्या दिवशी बांसुरी यांचे बुथ एजंट मतदारांना पत्रकं दाखवत होते. त्या पत्रकांमध्ये बांसुरी यांचे छायाचित्र, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (ईव्हीएम) त्यांच्याविषयीची माहिती आदींचा समावेश होता. ती पत्रकं दाखवून बांसुरी यांना मत देण्याचे आवाहन करणे भ्रष्ट कृत्य आहे, असे भारती यांनी याचिकेत म्हटले आहे.
भारती यांनी आपला रामराम ठोकणारे माजी मंत्री राजकुमार आनंद यांच्या उमेदवारीचा विषयही उपस्थित केला आहे. आनंद यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून बसपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. आपची मतं खाण्यासाठी आणि बांसुरी यांना मदत करण्यासाठी आनंद बसपच्या तिकिटावर लढले. आनंद ९ एप्रिलपर्यंत माझ्या प्रचारात सहभागी होते. ते १० एप्रिलला अचानकपणे आपमधून बाहेर पडले. त्यांनी १० जुलैला भाजपमध्ये प्रवेश केला, असे भारती यांनी याचिकेत नमूद केले आहे. आनंद यांना अवघी ५ हजार ६२९ मतं मिळाली. ते बांसुरी आणि भारती यांच्या तुलनेत मतं मिळवण्यात खूप पिछाडीवर राहिले. बांसुरी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या आहेत.





