चाकण एमआयडीसीचा पाणी प्रश्न मिटणार

पुणे- चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील 19 गावांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी, असे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले.
यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. यावेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ, प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, “या योजनेच्या औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात येतो. तर पाणीपट्टी वसुली, चाकण इंडस्ट्रीज असोसिएशनमार्फत करण्यात येते. योजनेचे संकल्पित वर्ष हे 2021 असून लाभार्थी गावे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. सुधारित योजनेनुसार समाविष्ट गावांना सध्याचा लोकसंख्येचा दाखला व योजनेत समाविष्ट होण्यास इच्छुक असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.’





