आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चाैदा जणांवर गुन्हा दाखल, सहा जणांना अटक

पुणे-किरकोळ कारणातून जबर मारहाण केल्यानंतर सतत टाॅर्चर केल्याच्या कारणातून एका रिक्षा चालकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी चार महिलांसह चाैदा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सहा जणांना अटक केली.
रामदास मारुती कुसाळकर (वय ५१, रा.धर्मनगर, सोमेश्वर मंदिराजवळ, जनवाडी) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. हा प्रकार सोमेश्वर मंदिराच्या समोर, अरून कदम चाैक धर्मनगर जनवाडी येथे घडला. याबाबत, देविदास ऊर्फ व्यंकटेश मारुती कुसाळकर (वय.48,रा. जनवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणातून झालेल्या वादात आरोपींनी फिर्यादींच्या घरच्या लोकांना मारहाण केली होती. त्यानंतर देखील ते त्यांना सतत टार्चर करत होते. त्यातूनच फिर्यादींचे भाऊ रामदास कुसाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, शनिवारी त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला होता.
त्यात रामदास कुसाळकर हे यात फिर्यादी अथवा आरोपीही नव्हते. मात्र, त्यांचे नातेवाईक होते. यापूर्वी त्यांना, त्यांच्या मुलीला टोमणे मारले जात असल्याची तक्रार त्यांनी दिली नव्हती. याबाबतपोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.





