तुम्हीही क्रोम ब्राउजर वापरता? सरकारने यूजर्सला केले सावध, होऊ शकते ‘हे’ नुकसान

Google Chrome : तुम्ही जर गुगल क्रोमचा नियमित वापर करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. भारत सरकारशी संबंधित एजन्सी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) गुगल क्रोमचा वापर करणाऱ्या यूजर्सला सावध केले आहे. Windows किंवा MacOS वर या लोकप्रिय ब्राउजर्सचा वापर करणाऱ्या यूजर्सची खासगी व आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता आहे.
CERT-In ने कोणत्या डिव्हाइसवर गूगल क्रोम वापरणे धोकादायक आहे व यामध्ये कोणती त्रुटी आहे याबाबत माहिती दिली आहे. गूगल क्रोममधील काही त्रुटी एक्सटेंशन API ची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी आणि फ्री इन Skia, V8 वापरण्यामुळे समोर आली आहे.
क्रोममधील या त्रुटीमुळे सायबर गुन्हेगार आणि स्कॅमर्स फायदा घेऊन फसवणूक करू शकतात. या त्रुटीमुळे सायबर गुन्हेगार रिमोट पद्धतीने देखील यूजर्सची फसवणूक करू शकतात. थोडक्यात, स्कॅमर्स एक खास पद्धतीने डिझाइन केलेल्या वेबपेजच्या माध्यमातून तुमच्या ब्राउजरमध्ये शिरकाव करण्याची शक्यता आहे. तसेच, याद्वारे वैयक्तिक व आर्थिक माहिती चोरून बँक खात्यातून पैसे काढून घेतले जाऊ शकतात.
तसेच, कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ब्राउजरचे नवीन व्हर्जन वापरावे. तुम्ही क्रोम ब्राउजरचे जुने व्हर्जन वापरत असाल तर त्वरित अपडेट करा. Linux वरील 133.0.6943.53 पेक्षा जुने व्हर्जन आणि Window वरील 133.0.6943.53/54 पेक्षा जुने क्रोम व्हर्जन वापरणे टाळावे. तसेच, फोनवरील क्रोम अॅप अपडेट करावे.



