“अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त; 18 दिवस उलटूनही केंद्राची पथके आलीच नाही”

मुंबई – राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. आज 18 दिवस उलटूनही केंद्र सरकारचे पाहणी पथक राज्यात फिरकलेले नाही. यावर विरोधक चकार शब्दही बोलत नाहीत, नक्की काय गौडबंगाल आहे? कुठे गेले केंद्राचे पथक आणि विरोधक?, असे म्हणत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना टोला लगाविला. तसेच या प्रश्नावर विरोधकांनी मोठा आवाज नको पण किमान पोपटासारखा आवाज तरी काढावा, असा चिमटाही काढला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागासाठी महाविकासआघाडी सरकारने मदत जाहीर केली. आता केवळ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप होणे बाकी आहे. मात्र, अजूनही केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात आलेलेच नाही. यावर आता भाजप नेते का गप्प आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यात करोना प्रादुर्भावाचा धोका कायम असल्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 जागा भरण्यासाठी वेळ लागत आहे. आता पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यात अडचण येत आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची सर्व तयारी झाली आहे. त्यामुळे आता मी निवडणूक अधिकाऱ्यांकडे या मदतीचे वाटप करण्याची परवानगी मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले भाजप नेते केंद्र सरकारच्या मदतीसंदर्भात शांत का आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.