मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला आहे. एक बुळचट आणि सत्तेसाठी लाचार मुख्यमंत्री खुर्चीवर बसवला गेला, अशी टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. तसेच केंद्र सरकारला मुंबई गिळंकृत करायची आहे. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईची सूत्रे हाती घेतली आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषेदेमध्ये संजय राऊत म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्राची राहावी, मुंबई मराठी माणसांची राहावी यासाठी शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. पण, आता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी मराठी माणसाच्या स्वाभीमानावर घाला घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर ही मुंबई मिळाली आहे. या मुख्यमंत्र्यांमध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये मराठी म्हणून थोडाही स्वाभिमान असेल तर त्यांनी राजीमाना द्यावा आणि केंद्र सरकारला जाब विचारावा.” यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जहरी टीका केली आहे. “मिंधे सरकार, बुळसट सरकार उघड्या डोळ्यांची महाराष्ट्र आणि मुंबईचा अपमान पाहात आहे. बाळासाहेबांनी शिवसेनची स्थापनाच मुंबईसाठी केले होती. एकनाथ शिंदे लाचार, बुळचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. इतिहासात त्यांची अशीच नोंद होईल. त्यांनी मुंबईचा घास महाराष्ट्र द्रोही मोदी सरकारला गिळू दिला,” असेही संजय राऊत म्हणाले. तर नुकतेच मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला. यावरुन देखील संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आधी जनतेची लूट करायची आणि नंतर २०० रुपयांची सूट द्यायची. याचा अर्थ निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे दोनशे रुपयांची भीक जनतेच्या तोंडावर फेकण्यात आली आहे. ही लूट थांबवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, असं ते म्हणाले. संजय राऊत यांच्या या आरोपांवर शिंदे गट आणि भाजप काय उत्तर देणार हे पाहावे लागणार आहे.