Duleep Trophy 2025 : रजत पाटीदारचा जलवा! आरसीबीनंतर आता सेंट्रल झोनला नेलं फायनलमध्ये

Duleep Trophy 2025 Semifinal Highlights : बीसीसीआयने आयोजित केलेल्या प्रतिष्ठित दुलीप ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेंट्रल झोनने आपले स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात वेस्ट झोनविरुद्ध खेळताना सेंट्रल झोनने पहिल्या डावात आघाडी मिळवली आणि नियमानुसार नॉकआउट सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर त्यांना अंतिम फेरीचे तिकीट मिळाले.
आता सेंट्रल झोनचे लक्ष्य विजेतेपद पटकावण्यावर आहे. आयपीएलनंतर सलग दुसऱ्या मोठ्या स्पर्धेत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली सेंट्रल झोनने अंतिम फेरी गाठली आहे. 11 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यात सेंट्रल झोनचा सामना साउथ झोनशी होणार आहे.
पहिल्या डावातील आघाडीमुळे सेंट्रल झोन अंतिम फेरीत –
वेस्ट झोनने पहिल्या डावात सर्व बाद 438 धावा केल्या, तर सेंट्रल झोनने 600 धावांचा डोंगर उभारत 142 धावांची आघाडी घेतली. वेस्ट झोनने दुसऱ्या डावात 8 बाद 216 धावा केल्या, पण सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर सेंट्रल झोनने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
हेही वाचा – US Open 2025 : आर्यना सबालेंकावर पैशांचा पाऊस! सलग दुसऱ्यांदा यूएस ओपन ट्रॉफीवर नाव कोरत रचला इतिहास
वेस्ट झोनचा पहिला डाव: ऋतुराजचे गायकवाडचे शतक
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या वेस्ट झोनसाठी ऋतुराज गायकवाडने 184 धावांची शानदार खेळी केली. तनुष कोटियान (76), शार्दूल ठाकूर (64), आर्या देसाई (39) आणि श्रेयस अय्यर (25) यांनीही योगदान दिले. सेंट्रल झोनकडून सारांश जैन आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी 3, खलील अहमदने 2, तर दीपक चहरने 1 विकेट्स घेतली.
सेंट्रल झोनचा पहिला डाव: सामूहिक प्रयत्न
सेंट्रल झोनने पहिल्या डावात 600 धावा करत 142 धावांची आघाडी घेतली. शुभम शर्माने सर्वाधिक 96 धावा केल्या, तर उपेंद्र यादव (87), रजत पाटीदार (77), दानिश मालेवार (76), हर्ष दुबे (75), सारांश जैन (63) आणि आयुष पांडे (40) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेस्ट झोनकडून धर्मेंद्रसिंह जडेजाने 4, तर अर्जन नागवासवाला याने 3 विकेट्स घेतले.
वेस्ट झोनचा दुसरा डाव: जैस्वाल-कोटियानची झुंज अपयशी –
वेस्ट झोनने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (64) आणि आर्या देसाई (35) यांच्या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. तनुष कोटियान 40 धावांवर नाबाद राहिला, पण अन्य फलंदाज अपयशी ठरले. सेंट्रल झोनकडून सारांश जैनने 5, तर हर्ष दुबेने 3 विकेट्स घेतले. सामना अनिर्णित राहिला, पण पहिल्या डावातील आघाडीमुळे सेंट्रल झोनने अंतिम फेरीत स्थान मिळवले.





