Bengal Violence : बंगालच्या हिंसाचारग्रस्त भागांत केंद्रीय दले तैनात होणार; कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकता : पश्चिम बंगालच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ) तैनात केली जाणार आहेत. त्यासंबंधीचा आदेश शनिवारी कलकत्ता उच्च न्यायालयाने दिला. हिंसाचारासारखी स्थिती उद्भवल्यास डोळे बंद ठेऊ शकत नाही, अशी तीव्र टिप्पणीही न्यायालयाने केली.वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधातील निदर्शनांवेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या.
त्यानंतर बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय दले तैनात करण्याच्या मागणीची याचिका दाखल केली. संबंधित प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची गरज विचारात घेऊन न्यायालयाने सुटीच्या दिवशी सुनावणी घेतली. त्यावेळी केंद्रीय दल असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ७ तुकड्या हिंसाचारग्रस्त भागांत तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.
मात्र, स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफच्या जवानांची तैनाती योग्य प्रकारे करण्यात आली नसल्याचा आरोप अधिकारी यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय दलांच्या तैनातीचा आदेश दिला. ती दले राज्य प्रशासनाशी समन्वय ठेऊन कार्य करतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारांकडून स्थितीविषयी सविस्तर अहवाल मागवले.




