जम्मूमधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राचा ‘मोठा प्लान’, अमित शहांची उच्चस्तरीय बैठक सुरू

Amit Shah । जम्मू भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, 11 वाजता नॉर्थ ब्लॉकच्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच फोर्स आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीत आयबी आणि रॉचे प्रमुख अमित शहा यांना सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती देतील. या बैठकीत जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या दहशतवादी घटनांबाबत चर्चा करण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एकात्मिक योजना तयार केली जाऊ शकते. याशिवाय अमरनाथ यात्रेसाठी करण्यात आलेल्या कडक बंदोबस्ताचाही या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तसेच अमरनाथ यात्रेत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी यंत्रणांकडून कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांत चार दहशतवादी हल्ले
जम्मू-काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी हल्ल्यांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. जम्मू-काश्मीरमधील शांतता बिघडवण्यासाठी दहशतवादी प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय लष्करही त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. या हल्ल्यानंतर कठुआमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.





