सिमेंटचे दर वाढणार; कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याचा परिणाम

चेन्नई – जून महिन्यात इंडिया सिमेंट टप्प्याटप्प्याने सिमेंटच्या दरामध्ये प्रति बॅगेला 55 रुपयाची वाढ करणार असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.
इंडिया सिमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन श्रीनिवासन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एकूणच महागाई वाढल्यामुळे कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे. आम्ही एक जूनला 20 रुपये, 15 जूनला 15 रुपये आणि एक जुलैला 20 रुपयांची दरवाढ जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिमेंट निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आणि वाढता वाहतूक खर्च या हिशोबाने दरवाढ करणे आवश्यक झाले असल्याचे त्यांनी सांगितले. इतर काही कंपन्या सिमेंटचे दर कमी करण्याच्या शक्यतेवर विचार करीत असताना इंडिया सिमेंट कंपनी दरवाढ करणार आहे याकडे लक्ष वेधले असता श्रीनिवासन म्हणाले की इतर कंपन्यांचा जमाखर्च मला माहित नाही.
मी आमच्या कंपनीच्या ताळेबंदाकडे लक्ष दिले असता आमचा नफा योग्य पातळीवर ठेवण्यासाठी सिमेंटच्या दरात वाढ करावी लागेल. अन्यथा आम्हाला तोटा होईल. अशा परिस्थितीमध्ये कंपनी चालवणे अवघड जाईल. त्यामुळे आम्ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.





