सुरेशनगर गावात जल्लोष, कौतुकाचा वर्षाव! डवरी गोसावी समाजातील प्राजक्ता बाबरने मिळविली डॉक्टरेट पदवी

नेवासा : राष्ट्रपती पदक विजेते आदर्शगांव सुरेशनगर (ता. नेवासा) येथील डवरी गोसावी समाजातील मुलगी कु. डॉ. प्राजक्ता अर्जून बाबर हिने डॅाक्टरेट पदवी मिळवली आहे. नुकतीच “डॉ. आर. एस. गुंजल वेल्फेअर फाउंडेशनच्या होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज संगमनेर” यांच्याकडून प्राजक्तला डॉक्टरेट पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. यामुळे आदर्शगांव सुरेशनगर गावात तिच्या या यशाच्याबद्दल जल्लोष व्यक्त केला जात आहे.
कु. डॉ. प्राजक्ता बाबर हिने डॉक्टरेट पदवी मिळवून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पहिल्या युवतीने जिल्ह्यात यश संपादन करुन गावाच्या नांवलौकिकामध्ये मनाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे प्राजक्ता हिच्यावर सुरेशनगर गावांमध्ये कौतुकाचा मोठा वर्षाव केला जात आहे.
आदर्शगांव सुरेशनगर (ता. नेवासा) या गावात बहूतांशी बहुरुपी पोलीस मोठ्या प्रमाणात असून लोकांचा विरंगुळा करत आपल्या पोटाची खळगी भरत असतानाच या मुलीने चक्क डॉक्टरेट पदवी मिळविली असून बहूरुप्यांच्या गावात या मुलीचे वडील खरेखुरे पोलीस असून मुंबई पोलीस दलात त्यांची पोलीस कॉन्स्टेबल या पदावर असून श्रीरामपूर येथे कार्यरत आहेत. सुरेशनगरचे माजी सरपंच पांडुरंग उभेदळ, केशर उद्योग समुहाचे सुरेशराव उभेदळ यांच्यासह विविध मान्यवरांनी तिचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.





