नगरच्या रेल्वेस्थानकावर सीसीटीव्हीची नजर

नगर – नगर येथील रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
नगर रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक असून, सुमारे दीडशे वर्षे पुरातन आहे. या रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी येत असतात. शालेय विद्यार्थी, लष्करातील जवान, नागरिक आणि पर्यटकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. शिर्डी, शनिशिंगणापूर, तर शहरातील विविध स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक नगर रेल्वे स्थानकावर येत असतात. जिल्ह्याचे स्थान असलेल्या या रेल्वे स्थानकावर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य वधवा यांनी एम.सी.सी.आय.ए. मार्फत तसेच नगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने केली होती. या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला.
माजी खासदार दिलीप गांधी व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा चालू होता.या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे स्थानकावर 40 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर काही गैरप्रकार घडू नये याची दक्षता आणि घडल्यास चौकशीसाठी या कॅमेरे उपयोगी येतील, अशी आशा रेल्वे सल्लागार समिती सदस्य वधवा यांनी व्यक्त केली आहे.
लवकरच रेल्वे स्थानकावर सरकते जिने, तीन नंबरचे नवीन प्लॅटफॉर्म, नगर पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी पाठपुरावा चालू असल्याचे वधवा यांनी सांगितले आहे.





