सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीच्या दोन निविदा रद्द

पुणे – सौम्य लक्षणे असलेल्या करोना बाधितांना होम क्वारंटाइनची मुभा दिल्यानंतर 17 पैकी 8 क्वारंटाइन सेंटर्स महापालिकेने बंद केली आहेत. त्यामुळे येथील सीसीटीव्ही बसवण्यासाठी काढलेल्या दोन निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. या सेंटरमधील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू असलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आवश्यक असेल तेथेच बसवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे नगर अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर काही क्वारंटाइन सेंटरमध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. परंतू उर्वरित सेंटर्सला सीसीटीव्ही बसवण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रिया एका ठराविक ठेकेदारालाच मिळावी, यादृष्टीने निविदेत अटी-शर्ती टाकण्यात आल्याने अगोदरपासूनच या खरेदीवर काही सदस्यांनी आक्षेप नोंदवले होते. त्यामुळे ही प्रक्रिया वादात अडकली. अशातच सणस मैदान येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये खुल्या बाजारात 15 हजार रुपये किंमत असलेला एलईडी टीव्ही 25 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. असे 30 टीव्ही संच खरेदीत पालिकेचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिकच दक्ष झाले आहे. महापालिकेच्या कोणत्या क्वारंटाइन सेंटरमध्ये किती सीसीटीव्ही बसवले आहेत, याची यादी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणा असलेले परंतू सध्या बंद केलेल्या क्वारंटाइन सेंटरमधील यंत्रणा ज्या सेंटरमध्ये गरज आहे, तेथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन खरेदीसाठी काढण्यात आलेल्या दोन्ही निविदा रद्द केल्याचे कंदूल म्हणाले.





