Pune: मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक; चंद्रकांत पाटील यांची गणेश मंडळांना सूचना

पुणे – गणेशोत्सव काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी गणेश मंडळांनी आपल्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करणे आवश्यक आहे. जनजागृतीसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करावे. त्यासोबत ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिला पाहिजे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
चतु:शृंगी पोलीस ठाणे व पुणे महापालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेर येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पुणे शहर सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सयाजीराव गायकवाड, महापालिका उपायुक्त अविनाश सपकाळ, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गिरीश दाबकेकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले. कायद्याचे पालन करणाऱ्या गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. त्यामुळे गतवर्षी परवानगी घेतलेल्या मंडळांना पुन्हा परवानगीची गरज नाही. मात्र, परवानगी घेताना मंडळांनी नियम व अटींचे पालन करणे आवश्यक आहे. मंडळांनी महिलांची सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.





