वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी केल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित आरोपींचे अनेक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यातच आता आणखी एक फुटेज समोर आले असून वाल्मीक कराडचा साथीदार कारेगावचे सरपंच बालाजी तांदळे हा त्या फुटेजमध्ये दिसत आहे. बालाजी तांदळे यांनी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी केले असून ते आरोपींना देण्यात आल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. सध्या हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
बालाजी तांदळे हा कारेगावचे सरपंच असून वाल्मीक कराडचा साथीदार देखील आहेत. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर तो त्याला भेटण्यासाठी बीड पोलिस ठाण्यात देखील गेला होता. यावेळी बालाजी तांदळे याने बीड शहर पोलिस ठाण्यात मला धमकावल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच त्याने आरोपी विष्णू चाटे याला पाण्याच्या बॉटल्स न्यायालयात दिले असल्याचे देखील समोर आले होते. अशातच आता याच बालाजी तांदळेचा नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बालाजी तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट खरेदी करताना दुकानामध्ये दिसतो आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार यांना गेवराईच्या पोलीस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान त्यांना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आलाय. आणि हे पोलीस कोठडीत असलेले आरोपी साठीच ब्लँकेट घेतले होते, असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे आता बालाजी तांदळे याला पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोठडीतील आरोपींना ब्लँकेट पुरवल्याची बाब सिद्ध झाल्यास बालाजी तांदळे याच्या अडचणी वाढू शकतात.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांना गेवराईच्या पोलिस कोठडीत ठेवले होते. त्यादरम्यान आरोपींना लागणारे साहित्य बालाजी तांदळेने एका दुकानातून खरेदी केले. याचाच हा सीसीटीव्ही समोर आला आहे. या फुटेजमध्ये दुकानातून ब्लँकेट घेतल्याचे दिसत आहे. हेच ब्लँकेट पोलिस कोठडीत असलेल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
राज्यात ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा –
संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मागण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी जिल्हांच्या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. जनआक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सातत्याने उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत आहे. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी वैभवी करत आहे.





