सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर; गायकाच्या गाडीचा पाठलाग करत होत्या गाड्या

नवी दिल्ली : पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, मुसेवाला याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत मुसेवाला यांच्यासोबत असलेले आणखी दोन जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
सिद्धू मूसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेले पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू यांच्या हत्येच्या काही मिनिटांपूर्वीचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये दोन गाड्या मुसेवाला यांच्या कारचा पाठलाग करताना दिसत आहेत. मात्र, राज्य पोलिसांनी अद्याप या व्हिडिओला दुजोरा दिलेला नाही.
#WATCH | Punjab: A CCTV video shows two cars trailing Sidhu Moose Wala’s vehicle moments before he was shot dead in Mansa district. pic.twitter.com/SsJag33XHb
— ANI (@ANI) May 30, 2022
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धू मूसेवाला यांची काळी एसयूव्ही इतर अनेक वाहनांसह व्यस्त असलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहे. या ठिकाणाहून काही मिनिटांनी पुढे हा हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही वाहने घटनेपूर्वी मुसेवाला यांच्या काळ्या एसयूव्हीच्या मागे जाताना दिसत आहेत. यानंतर पांढऱ्या रंगाची बुलेरोही मागून वेगाने जाताना दिसत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंजाब पोलिसांशिवाय हरियाणा आणि इतर राज्यांच्या पोलिसांनाही सतर्क करण्यात आले आहे. पोलीस पथक दोन्ही वाहनांचा शोध घेत आहे. सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सशस्त्र आरोपी हरियाणातील नोंदणीकृत क्रमांकाची अल्टो कार हिसकावून पळून गेले. त्यामुळे इतर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.





