सरकारी शाळांमध्ये बसवणार CCTVकॅमेरे; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई – लैंगिक छळाच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी विधीमंडळात ही घोषणा केली.
राज्यात 65,000 हून अधिक सरकारी शाळा आहेत आणि त्यापैकी 1,000 हून अधिक शाळांमध्ये आधीपासूनच कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली. उर्वरित सरकारी शाळांसाठी आम्ही येत्या शैक्षणिक वर्षात कॅमेरे बसवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे, ज्याचे काम आधीच सुरू झाले आहे,असे मंत्र्यांनी सांगितले.
आम्ही या योजनेसाठी अधिक निधी कसा मिळवू शकतो ते पाहू. आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी, खासदार निधी आणि सीएसआर यांच्याकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्या म्हणाल्या.
एप्रिल 2016 मध्ये सर्व खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा शासन आदेश जारी करण्यात आला होता. त्याची किती अंमलबजावणी झाली याची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले.
जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना प्रथम सीसीटीव्ही कॅमेरे मिळतील. त्यानंतर आम्ही कमी पटसंख्येच्या शाळांकडे लक्ष देऊ असे त्यांनी सांगितले. तथापि, आम्ही पुढील शैक्षणिक वर्षात सर्व शाळांमध्ये कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न करू, असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.




