नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याण येथे सीबीआयने मोठी कारवाई करत बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना विमा एजंट म्हणून खोटे सादरीकरण करत लाखो रुपयांची फसवणूक केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना फसवण्याचे काम करत होते. यासाठी ६० जणांची टीम कार्यरत होती, जी प्रशिक्षित पद्धतीने लोकांना खोट्या ऑफर्सद्वारे फसवत होती. या कारवाईत सीबीआयने ५ लाख रुपये रोख, मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. या उपकरणांमधून आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांना ठाणे सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीतून आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे लवकरच आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक करणारे कॉल सेंटर स्थानिक स्तरावर कार्यरत असताना पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.