नवी दिल्ली :– व्हिडिओकॉन कंपनीचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मनी लॉंड्रिंग प्रकरणात सीबीआयने आज अटक केली. या प्रकरणात काही दिवसांपुर्वी सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. आज त्यांना याच प्रकरणात मुंबईतून अटक करण्यात आली. याच प्रकरणात सीबीआयने 23 डिसेंबर रोजी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना अटक केली होती. हे दाम्पत्य सध्या सीबीआय कोठडीत आहे.
सीबीआयने मार्च 2018 मध्ये दीपक कोचर आणि धूत यांच्याविरुद्ध व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या 40,000 कोटी रुपयांच्या कर्जाच्या कथित अनियमितते संबंधात प्राथमिक चौकशी सुरू केली होती.
त्यानंतर सीबीआयने चंदा कोचर, त्यांचे पती आणि वेणुगोपाल धूत यांच्यासह न्यूपॉवर रिन्युएबल्स, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड या त्यांच्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
#हिवाळीअधिवेशन2022 : कृषिमंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी – दिलीप वळसे पाटील
प्राथमिक चौकशीदरम्यान सीबीआयला असे आढळून आले की, व्हिडिओकॉन समूह आणि त्याच्याशी संबंधित कंपन्यांना जून 2009 ते ऑक्टोबर 2011 दरम्यान आयसीआयसीआय बॅंकेच्या धोरणांचे कथित उल्लंघन करून 1,875 कोटी रुपयांची सहा कर्जे मंजूर करण्यात आली होती. ही कर्जे 2012 मध्ये अनुत्पादित मालमत्ता म्हणजेच बुडित कर्जे म्हणून घोषित करण्यात आली होती, ज्यामुळे बॅंकेचे 1,730 कोटी रुपयांचे नुकसान झाले.