नीट-यूजी प्रकरणी सीबीआयची कारवाई; आणखी ५ जण ताब्यात

नवी दिल्ली – वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरप्रकरणी सीबीआयने सोमवारी आणखी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. सीबीआयने गुजरात, राजस्थान आणि बिहारमधील गैरप्रकारांच्या पाच नवीन प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ते म्हणाले की, केंद्रीय एजन्सीने गुजरात आणि बिहारमधील प्रत्येकी एक आणि राजस्थानमधील तीन प्रकरणांची स्वतःची एफआयआर म्हणून नोंद केली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील लातूरमधून आणखी एक प्रकरण तपासास घेण्याची शक्यता आहे.
बिहारमधील प्रकरण वगळता इतर चार स्थानिक अधिकारी, निरीक्षक आणि उमेदवारांकडून तोतयागिरी आणि फसवणुकीच्या वेगळ्या घटना आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच दिल्लीतील सीबीआयचे एक पथक सोमवारी सकाळी पाटणा येथील बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिट कार्यालयात पोहोचले. केंद्राने सीबीआयला चौकशीचे आदेश देईपर्यंत या प्रकरणाचा तपास करत असलेल्या या प्रकरणाशी संबंधित 18 जणांना अटक केली आहे.
या तपासादरम्यान पाटणा येथील घरातून जळलेल्या प्रश्नपत्रिकेचे तुकडे, अटक केलेल्यांचे मोबाईल, सिमकार्ड, लॅपटॉप, पोस्ट-डेटेड चेक आदी साहित्य जप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली.





