बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचे काम पुर्ण ! CM नितीश कुमार म्हणाले,”संकलित डेटा लवकरच..”

नवी दिल्ली – बिहार मध्ये जातनिहाय जनगणनेची माहिती गोळा करण्याचे काम पुर्ण झाले आहे, आता या माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटले आहे. जातनिहाय सर्वेक्षण समाजातील सर्व घटकांसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
संकलीत करण्यात आलेला जनगणनेचा डेटा लवकरच जाहीर केला जाईल अशी माहितीहीं त्यांनी दिली. याद्वारे सरकारला समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी काम करता येईल, ज्यात वंचित आहेत त्यांना योग्य न्याय देता येईल. याद्वारे कोणत्या भागात विकासाची गरज आहे हेही कळण्यास मदत होईल. इतर राज्यातही याचे अनुकरण होईल असा विश्वासही नितीशकुमार यांनी व्यक्त केला.
बिहार राज्यातील भाजपसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकमताने जात-आधारित सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. आज भाजप काय म्हणत आहे त्याची मी पर्वा करीत नाही. मी असे म्हणू शकतो की या सर्वेक्षण अहवालामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित गटांसाठी कल्याणकारी योजना चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी सरकारला मदत होईल. आम्ही पहिल्यापासूनच जात निहाय जनगणनेच्या बाजूने आहोत.
देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते पण या जनगणनेला झालेल्या विलंबाबाबत केंद्र मौन का बाळगून आहे. 2021 मध्ये ही दशवार्षिक जनगणना पूर्ण व्हायला हवी होती. पण अजून ती सुरूही झालेली नाही. यावर भाजपने बोलले पाहिजे.




